संस्कार भारती ही कलांच्या माध्यमातून व सर्व कलाकारांना एकत्र आणून सध्या लोप पावत चाललेल्या संस्कारांची जपणूक व जोपासना करण्याचे कार्य आपल्या भारतभर पसरलेल्या पंधराशेहून अधिक शाखांच्या माध्यमातून जोमाने करीत आहे. संस्कार भारती, पुणे, हा कदाचित एक-पंधराशेवा-अंश असावा. हा ब्लॉग म्हणजे पुणे महानगरातून होत असलेल्या कार्यक्रमांची एक झलक !
आपणही ह्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हावेत हीच ईच्छा !
04 September 2011
॥ श्री गजानन प्रसन्न ॥
संस्कार भारतीत माझी अगदि प्रथम, १० ऑक्टोबर २००३ ह्या दिवशी, पुण्यातील कृषी महाविद्यालयात श्री.सतीश ब्रह्मे ह्यांचेशी ओळख झाली व माझ्या चित्रकलेचे पंख पुन:श्च फडफडू लागले ! तेव्हा पासून जवळ जवळ आजपर्यंत, त्यांनी स्वत: बनवलेल्या व स्थापित केलेल्या गणपतीचे दर्शनाला ते आवर्जून बोलावतात व मी ही तत्परतेने दर्शना ला जात असतो. आज त्याचे दर्शन आपणा सर्वांना घडवित आहे ! बोला गणपती बाप्पा मोरया .
ही काही छायाचित्रे !
१) हा गणपती श्री. सतीश ब्रह्मे ह्यांनी बनवलेला आहे.
२) आणि हा कु. देवश्री हीने ( श्री. ब्रह्मे ह्यांची कन्या ही पण दर वर्षी गणपती करते) केलेला आहे.
कालचा दिवस खरचंच उत्साह जनक होता. आज निसर्ग चित्रणा साठी आम्ही गोखले इन्स्टीट्युट मध्ये गेलो होतो. तशी आज पावसाची बर्यापैकी उघडिप होती. अधून मधून सूर्यदेव चक्क दर्शनही देत होते ! त्यातच आज तिथे एका सिनेमाचे शुटींग ही चालू होते. काय गोष्ट आहे ते काही फारसे कळले नाही, परंतू बर्याच लहान मुली तिथे खेळतांना दिसत होत्या. मध्येच " कट " आवाज व्हायचा व हे खेळणे खिदळणे थांबायचे ! कुठल्याश्या गाण्यावर शुटींग चाललेले असल्याने पुन्हा तेच गाणे सुरू व्हायचे व मुलींचा खेळण्याचा गोंधळ सुरू व्हायचा, असे आलटून पालटून चालू होते.
ही पहा त्याची क्षणचित्रे
आणि ही एक छोटीशी क्लीप तुम्हीहि क्षणभर त्यांच्या आनंदात सामील व्हा !
तेव्हढ्या काळात मी माझे हे एक निसर्ग चित्रण संपविले, कसे आहे कॉमेंट्स द्यायला विसरू नका.
हे सर्व काही चालू असतांनाच, एक वेडगळ दिसणारी बाई इकडून तिकडून येरझार्या घालतांना दिसली, केस पिंजारलेले व पिवळट मळकट पंजाबी ड्रेस घातलेला, पण कानात इयर फोन लावून कुठलेसे गाणे ऐकण्यात तल्लिन झालेली ! मला तिची ही छबी का कोण जाणे एकदम आवडून गेली व मनात विचार आला की हिचे पोर्ट्रेट काढायला मिळाले तर ?
असा विचार मनात यायला व शेजारीच बसून माझे चित्रण बघत असलेला त्यांच्यातील एक ज्युनीअर आर्टीस्ट मला म्हणाला की , "तुम्ही पोर्ट्रेट्स सुध्दा काढता का ? "
मी म्हणालॊ, " हो काढतो की " व त्या मघाच्या तिथूनच जात असलेल्या बाई कडे वळून त्याला दाखवत म्हणालॊ , " ह्यांचे काढायला मिळाले तर ? "
तो म्हणाला " अहो एव्हढंच ना? मग बसतील की त्या , मी सांगू का त्यांना " असे महणत तो उठून त्यांचे पाशी गेला. त्यांची एकमेकांशी ओळख असावी, लगेचच त्या तयार होऊन बसल्या की त्या पुढे येऊन ! अगदि अजिबात न हालता , मग काय केली सुरूवात व अगदि आत्मविश्वासाने काढले त्यांचे पोर्ट्रेट !
मग कळले की हे वेडगळ पणाचे सोंग त्यांना त्या सिनेमात वठवावयाचे आहे व म्हणून मेक अप करून मधे वेळ होता म्हणून त्या हिंडत वेळ काढीत होत्या. मग त्त्यांचेशी ओळख व गप्पा सुरु झाल्यात त्यांचे नाव आहे ज्योती भावे- मते ! सिनेमा नाटके असतेच. त्या उत्तम नृत्यांगना पण आहेत. मुख्य म्हणजे त्या फेस बुक वर ही अॅक्टीव्ह आहेत ! नंतर जेव्हा त्यांची फेस बुक वरील प्रोफाईल पाहिल्यावर तेव्हा तर त्यांच्या इतर रग्गड अॅक्टीव्हीटीज कळल्या.
ही आहेत. ती त्यांच्या पोर्ट्रेट च्या वेळची क्षणचित्रे
हे पहिले पेन्सिल स्केच
सुरवातीचे वॉशेश
आकार घेऊ लागला !
आणि हे झाले व्यक्तिचित्र तयार !
आणखीन एक महीला चित्रकार माझ्या समवेत पहिल्यानेच निसर्ग चित्रणास आलेल्या होत्या त्यांनीही एक खाली दिलेले पोर्ट्रेट काढले !
हे सर्व आम्ही काहीच तसे एका बाजूला करित होतो, तो पर्यंत वर्गावर आलेले पसार झालेले होते. पण स्नेहल पागे ही पण आमच्या समवेतआलेली होती. नुकतेच तिने आपले अमेरिकेतील शिक्षण संपवून भारतात परतली आहे. ती ऑइल पेंट मध्ये लॅंड्स्केप काढीत होती , तिचेही काही फोटो खाली देत आहे.
तिचे काम चालू असतांना मी ही तिचे शुटींग केले, तिचे काही ब्रश स्ट्रोक्स पहाण्या साठी, ही बघा ती क्लीप.
बर्याच दिवसाने ही पोस्ट ब्लॉगवर आपल्या पुढे ठेवली आहे भट्टी जमली असेल तर नक्की सांगा !
संस्कार भारती संभाजी भाग, पुणे, च्या वतीने शनिवारी दिनांक १८ सप्टेंबर २०१० रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेचे चौथे पुष्प सम्पन्न झाले. खरे तर दुसऱ्या शनिवारी गणेशोत्सवाची सुरुवात होत असल्याने हे पुष्प नेहमीप्रमाणे दुसऱ्या ऐवजी तिसऱ्या शनिवारी ठेवले गेले. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संभाजी भागाच्या मातृशक्ती प्रमुख सौ. गीता कोलंगडे ह्यांनी पार पाडले
ह्यावेळी कुचिपुडी हा नृत्य प्रकार सादर करणाऱ्या नृत्यांगना होत्या कोहिनूर दर्डा. त्याच्या बरोबर त्यांची मैत्रीण पुर्वा गोडबोले ज्या कथक मधे तरबेज आहे, ह्यांनीही हजेरी लावली ! . ह्या दोघींनी कार्यक्रमाच्या शेवटी आपापल्या नृत्यशैली्चे सादरीकरण एका जुगलबंदीने करून एकूण कार्यक्रमाला खूपच उंचीवर नेऊन पोहोचवले.
आजच्या प्रमुख पाहूण्या होत्या निलिमाताई आध्ये, पुण्यातील प्रसिध्द नृत्यगुरू रोहिणी भाटे ह्यांच्या त्या शिष्या. तसेच गांधर्व महाविद्यालयातून व फर्ग्युसन मधून कथक नृत्यामधे प्रथम क्रमांकाने एम ए झाल्या. ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ, व गुरू रोहिणी भाटे ह्यांच्या नृत्य अॅकेडमीतून अध्यापन केले. स्वत:च्या ’प्रकृति कथक’ ह्या नृत्यालयाला पंधरा वर्षे झाली आहेत.नवे नवे प्रयोग करणे , नत्य विषयक लेखन करणेव्याख्याने देणे व नवनवीन शिष्या तयार करणे हे त्यांचे कार्य अखंडितपणे चालूच आहे. गणित हा ही त्यांच्या आवडत्या विषया पैकी एक, त्यात एम एस करून गणितातही अध्यापन केले होते.
प्रथम ह्या तिघी व पुणे महानगराचे संघटन मंत्री श्री. मिलिंद भोळे ह्यांनी नटराजाची पूजा केली. त्या नंतर सौ. स्वाती देव ह्यांनी संस्कार भारतीचे ध्येय गीत म्हटल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आजच्या नृत्यांगना कोहिनूर दर्डा ह्यांनी त्यांच्या खास कुचिपुडी ह्या शास्त्रीय नृत्य शैलीतून आपल्या एकेक रचना सादर करीत प्रस्तुत नृत्य साधनेचे चौथे पुष्प श्री मृत्युंजयेश्वराला अर्पण केले. कोहिनूर दर्डा ह्यांनी त्यांचे कुचिपुडी नृत्याचे शिक्षण आपल्या गुरू सौ. गायत्री आंबेकर ह्यांचे कडून घेतले. सौ. गायत्री आंबेकर ह्यांनी हैदराबाद तेलगु युनिव्हर्सिटीतून कुचिपुडी नृत्यात एम ए केलेले आहे. तसेच कोहिनूर, गेली अकरा वर्षे प्रख्यात नृत्यांगना सौ. स्वाती दैठणकर ह्यांच्या कडे भरतनाट्यम शिकत आहेत.
शालेय शिक्षणातही कोहिनूर नेहमीच पुढे राहिल्या आहेत ! अभिनव मधून दहावीच्या परिक्षेत त्यांना ९२ % मार्क्स पडले होते. पुढेही त्यांनी आपला अग्रक्रम कायम राखीत फर्ग्युसन मधून जर्मन भाषेत प्रथम येत मॅक्समुलरभवनची सलग दोन वर्षे स्कॉलरशिप मिळवीत दोनदा जर्मनीस जाऊन तिथेही आपल्या कलेचा ठसा उमटविला. इतर अनेक स्पर्धांमधून व सादरी करणांतून त्यांनी आपली चमक दाखवलेली आहे व आपले नाव सार्थ केले आहे !
अश्याच पध्दतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी, येत्या वर्षभर नृत्य साधना हा नूतन कार्यक्रम विविध नृत्य कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची पुढील वर्षभर व्यवस्था पहाण्याची जबाबदारी सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी स्विकारलेली आहेच.
नेहमीप्रमाणेच ह्याही कार्यक्रमाला श्रोतृवर्ग भरपूर संख्येने उपस्थित होता.
नृत्य साधनेचे तिसरे पुष्प नित्य नेमा प्रमाणे १४ ऑगष्ट २०१० रोजी संध्याकाळी सात वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात संपन्न झाले. सर्व प्रथम कु. हर्षदा भोळे हिने संस्कार भारतीचे ध्येय गीत सादर केले.
ह्या कार्यक्रमाला सौ. स्वाती दैठणकर ह्या प्रमुख पाहुण्या लाभल्या होत्या.श्रीयुत रवि देव ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमी वर प्रमुख पाहुण्यांनी, प्रत्येक कलाकाराच्या हृदयात ठसलेल्या नटराज दैवताबद्दल ची माहिती तसेच गुरुचे कलाकाराच्या आयुष्यातील अढळ स्थान आदि मुद्दे विस्तारून सांगत सर्वांना मार्गदर्शन केले.
आजच्या नृत्यांगना अमृता परांजपे ह्यांनी आपल्या कथ्थक नृत्य शैलीत प्रथम गुरुवंदना व नंतर ताल प्रस्तुती सादर केली. तसेच त्यांनी अभिनयाची खासीयत दर्शविणारी काही पदे ही सादर केलीत. त्या प्रख्यात गुरू सौ. शांभवी वझे ह्यांच्या शिष्या आहेत. नृत्य व अभिनय हे त्यांचे वैशिष्ठ्य असून त्यांनी सर्व प्रेक्षकांना सुमारे तास भर मंत्रमुग्ध केले होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्र प्रांताची बैठक नुकतीच पुण्यात आनंद मंगल कार्यालयात दिनांक ३१ जुलै व ०१ ऑगस्ट ह्या दोन दिवशी संपन्न झाली.
पहिल्या दिवशी दुपारी उद्घाटन झाले. त्या नंतर चर्चात्मक विविध सत्रे झालीत.
रात्री ९ ला " तेजोनिधी सावरकर " हा कार्यक्रम झाला.
ही त्याची चलत क्षण चित्रे
पहिले चलत चित्र :-
सुरुवातीला संस्कार भारतीचे ध्येय गीत झाले
नंतर ची दोन्ही चलत चित्रे आहेत -- स्वा. सावरकर ह्यांच्या ’जयोस्तुते श्री महन्मंगले ’ ह्या गीतावरील नृत्याने सुरुवात झाली त्याची
दुसऱ्या दिवसाच्या पहाटे ६ ला श्री.दिलीप काळे ह्यांचे संतूर वादन व पं अरविंद्कुमार आझाद ह्यांचा तबला अशी दोघांनी अहिरभैरव रागात जुगलबंदी सादर केली.
त्यानंतर ही विविध सत्रे झालीत. आगामी वर्ष हे पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या स्थापनेचे पंचविसावे असल्याने विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरविली गेली. नविन कार्यकारिणीची घोषणा झाली. श्री राहूल सोलापूरकर ह्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
गेल्या महिन्यात मासिक नृत्य साधनेस जोरात सुरूवात झालेली होती त्यामुळॆ दुसऱ्या पुष्पा बद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा अर्थातच अधिक वाढलेल्या होत्या.
संस्कार भारती पुणे, च्या वतीने आज शनिवारी दिनांक १० जुलै २०१० रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेच्या दसऱ्या पुष्पास तितक्याच दिमाखात सुरूवात झाली. ठरल्या प्रमाणे आजच्या नृत्यांगना होत्या अमृता सहस्रबुध्दे व आजच्या प्रमुख पाहूण्या होत्या भरतनाट्यम शिकविण्यात गेली सतरा वर्षे कार्यरत आहेत अश्या गुरूवर्य संध्या धर्म आणि संभाजी भागाच्या पालक सौ. विनया देसाई ह्यांनी सुरुवातीला नटराजाची पुजा केली.
नंतर संस्कार भारतीचे ध्येय गीत सौ. हिमानी लिमये ह्यांनी सादर केले. लगेचच प्रसिध्द नृत्यांगना अमृता सहस्रबुध्दे ह्यांनी भरतनाट्यम ह्या त्यांच्या खास शास्त्रीय नृत्य शैली तून आपल्या एकेक रचना सादर करीत प्रस्तुत नृत्य साधनेचे दुसरे पुष्प श्री मृत्युंजयेश्वराला अर्पण करीत उपस्थित श्रोतृवर्गाला मंत्रमुग्ध केले.
अश्याच पध्दतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी, येत्या वर्षभर नृत्य साधना हा नूतन कार्यक्रम विविध नृत्य कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची पुढील वर्षभर व्यवस्था पहाण्याची जबाबदारी सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी स्विकारलेली आहे. ह्या दसऱ्या पुष्पाच्या सादरी करणा नंतर त्या सर्व कार्यक्रम संपूर्ण ताकदीने पार पाडतील अशी आता खात्री वाटते.
आजच्या कार्यक्रमाला श्रोतृवर्ग भरपूर संख्येने उपस्थित होता.
संस्कार भारती संभाजी भाग, पुणे ह्यांच्या वतीने आज शनिवारी दिनांक ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ७ वाजता कर्वे रस्त्या वरील श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेची दिमाखात सुरूवात झाली. ठरल्या वेळेप्रमाणे सौ. किशोरी कलघटगी ह्यांनी माईकचा ताबा घेत सूत्र संचालनास सुरूवात केली.
हा त्याचा चलीत अंश पहा
नंतर संघटन मंत्री श्री. सारंग कुलकर्णी ह्यांनी प्रास्ताविकात संस्कार भारतीची पूर्व पिठीका व ह्या संस्थेच्या कार्याची व निरनिराळ्या उपक्रमांची माहीती दिली..
आजच्या प्रमुख नृत्यांगना सौ. स्वप्ना कुर्डुकर , प्रमुख उपस्थित प्रसिध्द ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर व संभाजी विभागाच्या भाग प्रमुख सौ. माधुरी जोशी ह्यांनी सुरुवातीला नटराजाचे पूजन केले..
हा त्याचा चलीत अंश पहा
त्यानंतर संस्कार भारतीचे ध्येय गीत झाल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या ओळखी झाल्या.
ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर ह्यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची पूर्वपिठिका विशद केली.
हा त्याचा चलीत अंश पहा
सौ. गीता कोलंगडे ह्यांनी थोडक्यात आभार मानलेत
हा त्याचा चलीत अंश पहा
त्या नंतर प्रसिध्द नृत्यांगना सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून आपल्या एकेक रचना सादर करीत व प्रस्तुत नृत्य साधनेचे पहिले पुष्प ओवीत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
हा त्याचा चलीत अंश पहा
हा त्याचा चलीत अंश पहा
हा त्याचा चलीत अंश पहा
हा त्याचा चलीत अंश पहा
हा त्याचा चलीत अंश पहा
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी, संस्कार भारती ही अखिल भारतीय संस्था संपूर्ण देशभर आपल्या पंधराशेहून अधिक शाखांमार्फत विविध कलांच्या माध्यमातून करीत असलेल्या कार्यां बद्दल आस्था दाखवली. एव्हढेच नव्हे तर त्यांनी स्वत:हून ह्या संस्थेचा आजपासून कार्यकर्ता होण्याचा मानस जाहिर केला. अश्याच पध्दतीने संस्कार भारतीशी अनेक कलाकार कार्यकर्ते संलग्न झालेले आहेत.
हा आहे जमलेला श्रोतृवर्ग
अश्याच पध्दतीने ह्या पुढे प्रत्येक महीन्याच्या दुसऱ्या शनिवारी येत्या वर्षभर नृत्य साधना हा नूतन कार्यक्रम विविध कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची मूळ कल्पना सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांची आहे. त्या स्वत: एक उत्तम नृत्यांगना असून त्यांनी पुढील वर्षभर ह्या कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी स्विकारली आहे.
ह्यापुर्वी अश्याच पध्दतीने ह्याच देवालयात प्रथित यश गायकांकडून एक वर्ष भर संगीत साधना सादर केली गेली होती, ह्याची आठवण काढीत अनेक उपस्थित श्रोत्यांनी ह्या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात
ह्या पुढेही सादर होणाऱ्या कार्यक्रमांना श्रोतेवर्ग आवर्जून उपस्थित राहून सहकार्य करतीलच.
संस्कार भारती पुणे सहर्ष सादर करीत आहे. एक वर्ष भर प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी कर्वे रस्त्या वरील श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधना सादर केली जाईल. त्यावेळी प्रसिध्द नृत्यांगना शास्त्रीय नृत्यातून आपली कला देवालयात सादर करतील. ह्यापुर्वी अश्याच पध्दतीने ह्याच देवालयात आपण एक वर्ष भर संगीत साधना सादर केलेली होती.
ह्या नृत्य साधनेचे पहिले पुष्प येत्या शनिवारी दिनांक ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ७ वाजता, सौ. स्वप्ना कुरूडकर ह्या भरतनाट्यम मधील आपल्या रचनातून सादर करणार आहेत.
त्यावेळी प्रसिध्द ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सर्वांनी ह्या पहिल्या व यानंतर सादर होणाऱ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे.
काल २ जून रोजी मुंबईला जाण्याचा योग आला. अश्या वेळी तेथील जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या ३ जून पर्यंत चालू असलेल्या श्रीयुत रवि देवांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला जाणार नाही हे कधी तरी शक्य आहे का ? माझ्या समवेत श्री. सुहास वागळे व श्री रघुवीर भरम हे पण आलेले होते. अर्थातच श्री. रवि देवांना आम्हा तिघां पुणेकर संस्कार भारतियांना पाहून मनापासून आनंद होणे हे अगदि स्वाभाविकच होते. तशी ह्या प्रदर्शनातील त्यांची बहुतांश चित्रे प्रत्यक्ष काम चालू असतांना पहायला मिळालेली होती, पण आता ती आर्ट गॅलरीत पहायला मिळणे हा एक अपूर्व भाग्याचा दिवस आहे. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रीणींना ती पहायला न मिळणे शक्य आहे अश्यांच्या सोयी साठी खाली काही क्षणचित्रे सादर करीत आहे.
संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे साप्ताहिक वर्ग शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० पासून दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत श्री. मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, पुणे येथे सुरू झाले आहेत. ह्या वर्गाची दखल दैनिक जागरण, सिटी प्लस, कोथरूड / पौड रोड, ह्यांनी त्यांच्या बुधवार दिनांक २८ आप्रिल,२०१० च्या अंकात घेतली.
फोटोवर क्लिक करा !
ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त संपूर्ण वर्षासाठी असणार आहे ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारी वरील शुल्कात ठिकठिकाणी होणाऱ्या निसर्गचित्रण वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. तसेच ह्या वर्गाला वेळोवेळी मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गाला कोणत्याही वयाच्या स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चितपणे लाभ करून घेता येणार आहे.
काल म्हणजे २९ एप्रिल २०१० रोजी संस्कार भारतीच्या संभाजी भाग व पुणे महानगरा मार्फत स्नेह मेळावा संपन्न झाला.
संस्कार भारती या अखिल भारतीय स्तरावर कलांच्या माध्यमातून संस्कार क्षम समाज घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थेची पुण्यात स्थापना होण्याच्या घटनेला चोवीस वर्षे पूर्ण होऊन रौप्य वर्षात पदार्पण होत आहे.
पुण्यात त्या क्षणाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याचे मनसुबे सुरू आहेतच. संस्कार भारतीच्या एकूण कार्यप्रणालीत संघटनेचे महत्व आपण सर्वच जाणून आहोत व त्यालाच केंद्र स्थानी ठेवून आज सारे कार्यकर्ते उत्सव मंगल कार्यालयात जमलो होतो. आजचा हा मेळावा आहे , नित्याची बैठक नाही हे आवर्जून सांगीतले गेले.
त्या साठी ध्येय गीत व एका समूह गीता नंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतला गेला व सर्व कार्यकर्ते आपसूकच अधिक मोकळे झाले.
मग झाली ती मुक्त चर्चा, विषय अर्थातच संघटनात्मक वृध्दी साठी काय केले पाहिजे? त्या साठी एक प्रश्नावली पण उपलब्ध केली, जी प्रत्येकाने भरून दिली. ती मते नंतर एक गठ्ठ्याने चहापानाचे वेळी श्री. शामराव जोशीं कडे सुपूर्त केली पुढील अभ्यासा साठी !
त्यानंतर श्री. शामराव जोशी, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ह्याचे पुढे तासभर अस्खलित व नेटके मार्गदर्शन पर भाषण झाले.
खिचडी व कढीचा पोटास आधार देत कार्यक्रमाची सांगता झाली.
१) श्री. शामराव जोशी, ह्यांचे मार्गदर्शन चालू असतांना.
मागिल शनिवारी १७ एप्रिल ला संस्कार भारतीच्या वतीने येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परिसरात वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्गाचे उद्घाटन झाले.
कालचा शनिवार हा त्या नंतरचा पहिला शनिवार. खरे तर संस्कार भारतीच्या वर्गांतून कोणीही एकजण असे काहीही शिकवत नाहीत. चित्रकला ही एक कला आहे व एकत्र येण्यातून, एकमेकांचे बघून आणि स्वत: साधना करीत ही कला साध्य होते असा आमचा विश्वास आहे. तॊ ही एक संस्कार आहे. त्याला वयाची वा कसलीच आडकाठी वा मर्यादा नाही. माणसाच्या अंगीची अनुकरण प्रियताच येथे कामी येते व येथे येणारा प्रत्येक जण आपोआप शिकत जातॊ अशी आमची धारणा आहे. तरी सुध्दा प्रस्तुत वर्गात पहिल्यानेच प्रवेश घेणाऱ्या ची वये आधीचे अनुभव ह्या सर्वांचा विचार करता येथे आधी थोडेशी पार्श्वभूमी तयार करावी लागणार ह्याची मला जाणीव झाली.
आज प्रथमच येणाऱ्यात १ मुलगा २ रीत गेलेल्या, दोघी ५ वीत गेलेल्या तर एक ७ वीत, रेग्युलर चित्रकला शिकणारी एकच ! बाकी काही मध्यमवयीन स्त्री पुरूष तर एक आजोबा ८० व्यात पदार्पण केलेले. त्यातील बहुतेकांची कल्पना शिसपेन्सिलीचा उपयोग लिहिण्याकरताच होतो व तीही कधी काळी हाती धरलेली ! चित्र काढण्या साठीही उपयोग होतॊ ह्याची जाणीव नव्यानेच होत असावी ! मात्र एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे चित्रकला यावी अशी मात्र सर्वांची दुर्दम्य इच्छा आणि तोच महत्वाचा प्लस पॉईंट !
माझी मात्र परीक्षा आहे खरीच. पहीलाच दिवस खूप धांदलीत गेला,ओळखी माहीतीची देवाण घेवाण इ.इ. पण सुरूवात तर छान झालीय ! अगदी पहीला धडा होता चित्रकले साठी पेन्सिल कशी हातात धरावी ! तिथे असलेली साधी पाण्याची बाटली माझ्या पहाण्यात आली व तीच समोर ठेवून त्याचे चित्र काढायला सांगीतले. मग लक्षात आले की चित्र काढण्यासाठी वस्तु कडे बघायचे कसे , काय ? तिला कागदावर चितारायचे म्हणजे काय करायला हवंय ? मग प्रश्न पडला ह्याचे मोजमाप घ्यायचे म्हणजे कसे? कागदाच्या आकारात ते कसे बसवायचे? प्रश्नातून प्रश्न येत होते.
पण तरीही पहीलाच दिवस खूप चांगला गेला. तसं म्हटलं तर मी तरी चित्रकला हा विषय कुठे शास्त्रशुध्द शिकलेलो आहे ? पाचवी ते आठवी व त्यातच चित्रकलेच्या दोन परिक्षा एव्हढेच माझे तुट्पुंजे शिक्षण. तेव्हा आम्हाला नाशिकला पेठे हायस्कूल ला डोंगरेसर नावाचे चित्रकला शिक्षक होते. खरे तर ते प्रसिध्द चित्रकार व्हायचे त्यावेळेच्या प्रसिध्द चित्रकारात त्यांची चांगली उठबस होती. मला आठवत्येय केवळ मैत्रीखातर अलमेलकरांसारख्या प्रसिध्द चित्रकारांचे प्रात्यक्षिक आम्हाला शाळेत दाखविण्याची व्यवस्था डोंगरे सरांनी केली होती. त्यांनी स्वत:ला चित्रकला शिकविण्याला वाहून घेतलेले होते. अगदी हाडाचे शिक्षक. त्यांनी त्यावेळी काय काय शिकवले होते त्याचे अर्थ मला गेल्या सहा वर्षातील संस्कार भारतीच्या नित्य साधनेतून उलगडत गेले. तीच आमची गांठीला बांधलेली शिदोरी, बहुदा आता उपयोगी पडेलसे वाटतंय !
मागे मी एक संस्कार भारतीच्या रौप्य महोत्सवाचे वेळी ब्लॉग सुरू केला होता. माझ्या त्याच जुन्या ब्लॉग चे नव्याने रूप पालटवले आहे. ह्या ब्लॉगचे नाव ठेवले आहे.
" संस्कार भारती, पुणे "
आज जो मी काही आपण समोर आहे त्यात संस्कार भारतीचा फार म्हाणजे फारच मोठा वाटा आहे. एक काळ असा आला होता की आता मी पुढे काय करायचे? नोकरीतून कधीच सेवानिवृत्ती घेतली होती ( १९८७ मधेच ). त्यानंतर मी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बिल्डर झालॊ. मिलिटरी इंजीनीयरींगची अनेक कामे पार पाडलीत. एकाच वर्षात दोन्ही कन्यकांना त्यांचे त्यांचे घरी रवाना केले. वयाची साठी होऊन गेली होती व आता कुठे तरी थांबावे असे प्रकर्षाने वाटू लागले होते.
अश्याच वेळी माणसाला काही तरी विरंगुळाच्या छंदांची अवश्यकता असते. मला चित्रकलेची लहान पणा पासून आवड. पण तेव्हा आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याचा काळ नव्हता. त्यातून चित्रकला हा विषय म्हणजे आयुष्य़भर शामा ( शाळा मास्तर ) ही पिढ्यांपिढ्याची कल्पना ! कुठल्या आईबापाला ती आवडेल? म्हणून आमची रवानगी दुसऱ्या विषयाकडे झाली !
माझे नशीब अत्यंत थोर असेच मी म्हणेन, कारण नेमक्या अश्या वेळी एका व्यक्तीने माझे बोट धरून थेट संस्कार भारतीच्या दारात आणून सोडले. त्यालाही आता सात वर्षे होतील. पण त्या दिवसा पासून जे पेन्सिल, रंग, कागद आणि ब्रश हाती आले ते मात्र हातात घट्ट राहून गेले. एका भरकटू पहाणाऱ्य़ा मनाला पुढला मार्ग स्वच्छ दिसला होता. वेळ कसा घालवायचा त्या ऐवजी वेळ कसा पुरवायचा असेच प्रश्न पडू लागले आणि फारा वर्षांची इच्छा फलद्रुप झाली. इतक्या उशीराने का होईना माझी चित्र साधना जोमाने सुरू झाली. आपणाला जसा हा हा मार्ग सांपडला तसा इतर गरजूंनाही ही वाट दाखवावी असे वाटू लागले.
आणि म्हणूनच आता एका नवीन "वस्तु व व्यक्ती चित्रणाच्या" वर्गाची मी जबाबदारी घेतलीय, ज्याचे उद्घाटन गेल्या १७ एप्रील २०१० रोजी पुण्यातील कोथरूड मधील मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परीसरात पार पडले.
त्याचा वृत्तांत आधीच्या चित्रमय पोस्ट मधे दिला आहेच.
संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाच्या साप्ताहिक वर्गाला आज शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० रोजी शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, कोथरूड ,पुणे येथे दिमाखात सुरूवात झाली.
प्रथम दुपारी ३ वाजता पुणे शहराचे चित्रकला प्रमुख श्री . कुडल हिरेमठ ह्यांनी प्रास्ताविक केले, त्यात सर्वांचे स्वागत करीत अखिल भारतीय संस्कार भारती ह्या संस्थेची माहीती दिली.
प्रस्तुतचा आजचा वर्ग हा पुण्यातील निरनिराळ्या अश्या प्रकारे कार्यरत असलेल्या वर्गां मधील आठवा असल्याचे नमूद केले.
व्यासपीठावर आजचे उद्घाटक श्री. प्रभाकर जोशी , श्री उल्हास जोशी पश्चिम प्रांताचे चित्रकला प्रमुख व श्री भिंगारे, देवस्थानाचे व्यवस्थापक होते. श्री प्रभाकर जोशींची ह्यांची श्री कुडल हिरेमठ ह्यांनीओळख करून दिली. त्यांनी जे जे मधून चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर काही शाळां मधून कला शिक्षकाचे काम केले. त्या काळात फोटोग्राफीत मास्टरी मिळविली.त्यात पेंटींग्स मध्ये कित्येक बक्षीसेही मिळवलीत. सध्या वयाच्या ८६ व्या वर्षीही अजूनही सातत्याने ते रोज एक तरी चित्र काढतातच.
श्री. प्रभाकर जोशींनी नटराजाच्या मुर्तीचे पूजन केले. आपल्या भाषणात त्यांनी स्केचिंगचे महत्व पटवून देत आजही ते स्वत: रोज स्केचेस काढतात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. कितीही थोडा वेळ असला तरी छोट्यात छोटे स्केच तरी प्रत्येकाने रोज काढायलाच हवे ह्यावर त्यांनी भर दिला आणि ह्या वर्गाचे उद्घाटन केल्याचे जाहिर केले.
त्या नंतर ह्या वर्गाची जबाबदारी घेणारे श्री. सुरेश पेठे ह्यांनी समारोपात देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख ट्रस्टी श्री पेशवे व व्यवस्थापक श्री भिंगारे ह्याचे , ह्या वर्गाला जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून आभार मानले.
शेवटी श्री कुडल हिरेमठ ह्यांनी प्रसिध्द चित्रकार श्री रामचंद्र खरटमल ह्याची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी, श्री. प्रभाकर जोशी ह्यांचे पेन्सिलने स्केचींगचे प्रात्यक्षिक दाखवले.
व्यक्ती चित्रणाचे प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर श्री. रामचंद्र खरटमल ह्यांनी चित्रकाराच्या जीवनातील स्केचिंगचे महत्व सांगीतले. तसेच स्केचिंग कसे कसे करत जावे, काय काय गोष्टी विचारात घेत जाव्यात, कुठल्यांना महत्व द्यावे व स्केचिंग पुर्णत्वास न्यावे ह्याचा उहापोह करीत श्रोत्यांच्या शंकाचेही समाधान केले.
उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम पार पडल्या वर वर्गाला हजर झालेल्या सर्वांनी स्केचिंग करून सर्वार्थाने हा सोहोळा पूर्णत्वास नेला.
कार्यक्रमा ची सांगता अमृतकोकम च्या पेयपानाने झाली. कार्यक्रमाला २५ जणांची उपस्थिती होती.
ह्यापुढे दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत हा वर्ग येथेच मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्गरम्य परिसरात भरला जाणार आहे. चित्रकलेची मनापासून आवड व भरपूर काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांना हा वर्ग खुला आहे. संस्कार भारतीची सभासद फी अत्यल्प म्हणजे रु. २०० /- असून, ह्या वा अन्य कुठल्याही वर्गावर येऊन साधना करता येते. ह्या वर्गाचे प्रमुख श्री. सुरेश पेठे ( ९८५०४८८६४०) ह्यांचेशी संपर्क साधून आपणही ह्यात सहभागी होऊ शकता.