22 April 2010

ब्लॉगचे पुनरुज्जीवन




मागे मी एक संस्कार भारतीच्या रौप्य महोत्सवाचे वेळी ब्लॉग सुरू केला होता. माझ्या त्याच जुन्या ब्लॉग चे नव्याने रूप पालटवले आहे. ह्या ब्लॉगचे नाव ठेवले आहे.

" संस्कार भारती, पुणे "

आज जो मी काही आपण समोर आहे त्यात संस्कार भारतीचा फार म्हाणजे फारच मोठा वाटा आहे. एक काळ असा आला होता की आता मी पुढे काय करायचे? नोकरीतून कधीच सेवानिवृत्ती घेतली होती ( १९८७ मधेच ). त्यानंतर मी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बिल्डर झालॊ. मिलिटरी इंजीनीयरींगची अनेक कामे पार पाडलीत. एकाच वर्षात दोन्ही कन्यकांना त्यांचे त्यांचे घरी रवाना केले. वयाची साठी होऊन गेली होती व आता कुठे तरी थांबावे असे प्रकर्षाने वाटू लागले होते.

अश्याच वेळी माणसाला काही तरी विरंगुळाच्या छंदांची अवश्यकता असते. मला चित्रकलेची लहान पणा पासून आवड. पण तेव्हा आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याचा काळ नव्हता. त्यातून चित्रकला हा विषय म्हणजे आयुष्य़भर शामा ( शाळा मास्तर ) ही पिढ्यांपिढ्याची कल्पना ! कुठल्या आईबापाला ती आवडेल? म्हणून आमची रवानगी दुसऱ्या विषयाकडे झाली !

माझे नशीब अत्यंत थोर असेच मी म्हणेन, कारण नेमक्या अश्या वेळी एका व्यक्तीने माझे बोट धरून थेट संस्कार भारतीच्या दारात आणून सोडले. त्यालाही आता सात वर्षे होतील. पण त्या दिवसा पासून जे पेन्सिल, रंग, कागद आणि ब्रश हाती आले ते मात्र हातात घट्ट राहून गेले. एका भरकटू पहाणाऱ्य़ा मनाला पुढला मार्ग स्वच्छ दिसला होता. वेळ कसा घालवायचा त्या ऐवजी वेळ कसा पुरवायचा असेच प्रश्न पडू लागले आणि फारा वर्षांची इच्छा फलद्रुप झाली. इतक्या उशीराने का होईना माझी चित्र साधना जोमाने सुरू झाली. आपणाला जसा हा हा मार्ग सांपडला तसा इतर गरजूंनाही ही वाट दाखवावी असे वाटू लागले.

आणि म्हणूनच आता एका नवीन "वस्तु व व्यक्ती चित्रणाच्या" वर्गाची मी जबाबदारी घेतलीय, ज्याचे उद्‌घाटन गेल्या १७ एप्रील २०१० रोजी पुण्यातील कोथरूड मधील मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परीसरात पार पडले.

त्याचा वृत्तांत  आधीच्या चित्रमय पोस्ट मधे दिला आहेच.