30 April 2010

स्नेह मेळावा







काल म्हणजे २९ एप्रिल २०१० रोजी संस्कार भारतीच्या संभाजी भाग व पुणे महानगरा मार्फत स्नेह मेळावा संपन्न झाला.

संस्कार भारती या अखिल भारतीय स्तरावर कलांच्या माध्यमातून संस्कार क्षम समाज घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थेची पुण्यात स्थापना होण्याच्या घटनेला चोवीस वर्षे पूर्ण होऊन रौप्य वर्षात पदार्पण होत आहे.

पुण्यात त्या क्षणाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याचे मनसुबे सुरू आहेतच. संस्कार भारतीच्या एकूण कार्यप्रणालीत संघटनेचे महत्व आपण सर्वच जाणून आहोत व त्यालाच केंद्र स्थानी ठेवून आज सारे कार्यकर्ते उत्सव मंगल कार्यालयात जमलो होतो. आजचा हा मेळावा आहे , नित्याची बैठक नाही हे आवर्जून सांगीतले गेले.

त्या साठी ध्येय गीत व एका समूह गीता नंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतला गेला व सर्व कार्यकर्ते आपसूकच अधिक मोकळे झाले.

मग झाली ती मुक्त चर्चा, विषय अर्थातच संघटनात्मक वृध्दी साठी काय केले पाहिजे? त्या साठी एक प्रश्नावली पण उपलब्ध केली, जी प्रत्येकाने भरून दिली. ती मते नंतर एक गठ्ठ्याने चहापानाचे वेळी श्री. शामराव जोशीं कडे सुपूर्त केली पुढील अभ्यासा साठी !

त्यानंतर श्री. शामराव जोशी, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ह्याचे पुढे तासभर अस्खलित व नेटके मार्गदर्शन पर भाषण झाले.

खिचडी व कढीचा पोटास आधार देत कार्यक्रमाची सांगता झाली.



१) श्री. शामराव जोशी, ह्यांचे मार्गदर्शन चालू असतांना.





२) कार्यकर्ते मन लावून भाषण ऐकण्यात तल्लीन.
 
 

25 April 2010

शिकवण्याचा पहिला दिवस !





मागिल शनिवारी १७ एप्रिल ला संस्कार भारतीच्या वतीने येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परिसरात वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्गाचे उद्‌घाटन झाले.

http://roupya.blogspot.com/2010/04/blog-post_17.html

कालचा शनिवार हा त्या नंतरचा पहिला शनिवार. खरे तर संस्कार भारतीच्या वर्गांतून कोणीही एकजण असे काहीही शिकवत नाहीत. चित्रकला ही एक कला आहे व एकत्र येण्यातून, एकमेकांचे बघून आणि स्वत: साधना करीत ही कला साध्य होते असा आमचा विश्वास आहे. तॊ ही एक संस्कार आहे. त्याला वयाची वा कसलीच आडकाठी वा मर्यादा नाही. माणसाच्या अंगीची अनुकरण प्रियताच येथे कामी येते व येथे येणारा प्रत्येक जण आपोआप शिकत जातॊ  अशी आमची धारणा आहे. तरी सुध्दा प्रस्तुत वर्गात पहिल्यानेच प्रवेश घेणाऱ्या ची वये आधीचे अनुभव ह्या सर्वांचा विचार करता येथे आधी थोडेशी पार्श्वभूमी तयार करावी लागणार ह्याची मला जाणीव झाली.
आज प्रथमच येणाऱ्यात १ मुलगा २ रीत गेलेल्या, दोघी ५ वीत गेलेल्या तर एक ७ वीत, रेग्युलर चित्रकला शिकणारी एकच ! बाकी काही मध्यमवयीन स्त्री पुरूष तर एक आजोबा ८० व्यात पदार्पण केलेले. त्यातील बहुतेकांची कल्पना शिसपेन्सिलीचा उपयोग लिहिण्याकरताच होतो व तीही कधी काळी हाती धरलेली ! चित्र काढण्या साठीही उपयोग होतॊ ह्याची जाणीव नव्यानेच होत असावी ! मात्र एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे चित्रकला यावी अशी मात्र सर्वांची दुर्दम्य इच्छा आणि तोच महत्वाचा प्लस पॉईंट !

माझी मात्र परीक्षा आहे खरीच. पहीलाच दिवस खूप धांदलीत गेला,ओळखी माहीतीची देवाण घेवाण इ.इ. पण सुरूवात तर छान झालीय ! अगदी पहीला धडा होता चित्रकले साठी पेन्सिल कशी हातात धरावी ! तिथे असलेली साधी पाण्याची बाटली माझ्या पहाण्यात आली व तीच समोर ठेवून त्याचे चित्र काढायला सांगीतले. मग लक्षात आले की चित्र काढण्यासाठी वस्तु कडे बघायचे कसे , काय ? तिला कागदावर चितारायचे म्हणजे काय करायला हवंय ? मग प्रश्न पडला ह्याचे मोजमाप घ्यायचे म्हणजे कसे? कागदाच्या आकारात ते कसे बसवायचे? प्रश्नातून प्रश्न येत होते.
पण तरीही पहीलाच दिवस खूप चांगला गेला. तसं म्हटलं तर मी तरी चित्रकला हा विषय कुठे शास्त्रशुध्द शिकलेलो आहे ? पाचवी ते आठवी व त्यातच चित्रकलेच्या दोन परिक्षा एव्हढेच माझे तुट्पुंजे शिक्षण. तेव्हा आम्हाला नाशिकला पेठे हायस्कूल ला डोंगरेसर नावाचे चित्रकला शिक्षक होते. खरे तर ते प्रसिध्द चित्रकार व्हायचे त्यावेळेच्या प्रसिध्द चित्रकारात त्यांची चांगली उठबस होती. मला आठवत्येय केवळ मैत्रीखातर अलमेलकरांसारख्या प्रसिध्द चित्रकारांचे प्रात्यक्षिक आम्हाला शाळेत दाखविण्याची व्यवस्था डोंगरे सरांनी केली होती.  त्यांनी स्वत:ला चित्रकला शिकविण्याला वाहून घेतलेले होते. अगदी हाडाचे शिक्षक. त्यांनी त्यावेळी काय काय शिकवले होते त्याचे अर्थ मला गेल्या सहा वर्षातील संस्कार भारतीच्या नित्य साधनेतून उलगडत गेले. तीच आमची गांठीला बांधलेली शिदोरी, बहुदा आता उपयोगी पडेलसे वाटतंय !

22 April 2010

ब्लॉगचे पुनरुज्जीवन




मागे मी एक संस्कार भारतीच्या रौप्य महोत्सवाचे वेळी ब्लॉग सुरू केला होता. माझ्या त्याच जुन्या ब्लॉग चे नव्याने रूप पालटवले आहे. ह्या ब्लॉगचे नाव ठेवले आहे.

" संस्कार भारती, पुणे "

आज जो मी काही आपण समोर आहे त्यात संस्कार भारतीचा फार म्हाणजे फारच मोठा वाटा आहे. एक काळ असा आला होता की आता मी पुढे काय करायचे? नोकरीतून कधीच सेवानिवृत्ती घेतली होती ( १९८७ मधेच ). त्यानंतर मी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बिल्डर झालॊ. मिलिटरी इंजीनीयरींगची अनेक कामे पार पाडलीत. एकाच वर्षात दोन्ही कन्यकांना त्यांचे त्यांचे घरी रवाना केले. वयाची साठी होऊन गेली होती व आता कुठे तरी थांबावे असे प्रकर्षाने वाटू लागले होते.

अश्याच वेळी माणसाला काही तरी विरंगुळाच्या छंदांची अवश्यकता असते. मला चित्रकलेची लहान पणा पासून आवड. पण तेव्हा आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याचा काळ नव्हता. त्यातून चित्रकला हा विषय म्हणजे आयुष्य़भर शामा ( शाळा मास्तर ) ही पिढ्यांपिढ्याची कल्पना ! कुठल्या आईबापाला ती आवडेल? म्हणून आमची रवानगी दुसऱ्या विषयाकडे झाली !

माझे नशीब अत्यंत थोर असेच मी म्हणेन, कारण नेमक्या अश्या वेळी एका व्यक्तीने माझे बोट धरून थेट संस्कार भारतीच्या दारात आणून सोडले. त्यालाही आता सात वर्षे होतील. पण त्या दिवसा पासून जे पेन्सिल, रंग, कागद आणि ब्रश हाती आले ते मात्र हातात घट्ट राहून गेले. एका भरकटू पहाणाऱ्य़ा मनाला पुढला मार्ग स्वच्छ दिसला होता. वेळ कसा घालवायचा त्या ऐवजी वेळ कसा पुरवायचा असेच प्रश्न पडू लागले आणि फारा वर्षांची इच्छा फलद्रुप झाली. इतक्या उशीराने का होईना माझी चित्र साधना जोमाने सुरू झाली. आपणाला जसा हा हा मार्ग सांपडला तसा इतर गरजूंनाही ही वाट दाखवावी असे वाटू लागले.

आणि म्हणूनच आता एका नवीन "वस्तु व व्यक्ती चित्रणाच्या" वर्गाची मी जबाबदारी घेतलीय, ज्याचे उद्‌घाटन गेल्या १७ एप्रील २०१० रोजी पुण्यातील कोथरूड मधील मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परीसरात पार पडले.

त्याचा वृत्तांत  आधीच्या चित्रमय पोस्ट मधे दिला आहेच.

17 April 2010

वस्तू - आणि - व्यक्ती चित्रण वर्ग सुरू झाला.





                                                                 नटराज पूजन

संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाच्या साप्ताहिक वर्गाला आज  शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१०  रोजी शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, कोथरूड ,पुणे येथे दिमाखात सुरूवात झाली.

प्रथम दुपारी ३ वाजता पुणे शहराचे चित्रकला प्रमुख श्री . कुडल हिरेमठ ह्यांनी प्रास्ताविक केले, त्यात  सर्वांचे स्वागत करीत अखिल भारतीय संस्कार भारती ह्या संस्थेची माहीती दिली.



 प्रस्तुतचा आजचा वर्ग हा पुण्यातील निरनिराळ्या अश्या प्रकारे  कार्यरत असलेल्या वर्गां मधील आठवा असल्याचे नमूद केले.


व्यासपीठावर आजचे उद्‌घाटक श्री. प्रभाकर जोशी , श्री उल्हास जोशी पश्चिम प्रांताचे चित्रकला प्रमुख व श्री भिंगारे, देवस्थानाचे व्यवस्थापक होते. श्री प्रभाकर जोशींची ह्यांची  श्री कुडल हिरेमठ ह्यांनीओळख करून दिली.  त्यांनी जे जे मधून चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर काही शाळां मधून कला शिक्षकाचे काम केले. त्या काळात फोटोग्राफीत मास्टरी  मिळविली.त्यात पेंटींग्स मध्ये कित्येक बक्षीसेही मिळवलीत. सध्या वयाच्या ८६ व्या वर्षीही अजूनही सातत्याने ते रोज एक तरी चित्र काढतातच.





श्री. प्रभाकर जोशींनी  नटराजाच्या मुर्तीचे पूजन केले. आपल्या भाषणात त्यांनी स्केचिंगचे महत्व पटवून देत आजही ते स्वत: रोज स्केचेस काढतात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. कितीही थोडा वेळ असला तरी छोट्यात छोटे स्केच तरी प्रत्येकाने रोज काढायलाच हवे ह्यावर त्यांनी भर दिला आणि ह्या वर्गाचे उद्‌घाटन केल्याचे जाहिर केले.




 त्या नंतर ह्या वर्गाची जबाबदारी घेणारे श्री. सुरेश पेठे ह्यांनी समारोपात देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख ट्रस्टी श्री पेशवे व व्यवस्थापक श्री भिंगारे ह्याचे , ह्या वर्गाला जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून आभार मानले.
शेवटी श्री कुडल हिरेमठ ह्यांनी  प्रसिध्द चित्रकार श्री रामचंद्र खरटमल ह्याची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी,  श्री. प्रभाकर जोशी ह्यांचे पेन्सिलने स्केचींगचे प्रात्यक्षिक  दाखवले.








व्यक्ती चित्रणाचे प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर श्री. रामचंद्र खरटमल ह्यांनी चित्रकाराच्या जीवनातील स्केचिंगचे महत्व सांगीतले. तसेच स्केचिंग कसे कसे करत जावे, काय काय गोष्टी विचारात घेत जाव्यात, कुठल्यांना महत्व द्यावे व स्केचिंग पुर्णत्वास न्यावे ह्याचा उहापोह करीत श्रोत्यांच्या शंकाचेही समाधान केले.



उद्‌घाटनाचा मुख्य कार्यक्रम पार पडल्या वर वर्गाला हजर झालेल्या  सर्वांनी स्केचिंग करून सर्वार्थाने हा सोहोळा पूर्णत्वास नेला.


कार्यक्रमा ची सांगता अमृतकोकम च्या पेयपानाने झाली. कार्यक्रमाला २५ जणांची उपस्थिती होती.


ह्यापुढे दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत हा वर्ग येथेच मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्गरम्य परिसरात भरला जाणार आहे. चित्रकलेची मनापासून आवड व भरपूर काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांना हा वर्ग खुला आहे.  संस्कार भारतीची सभासद फी अत्यल्प म्हणजे रु. २०० /- असून,   ह्या वा अन्य कुठल्याही वर्गावर येऊन साधना करता येते. ह्या वर्गाचे प्रमुख श्री. सुरेश पेठे ( ९८५०४८८६४०)  ह्यांचेशी संपर्क साधून आपणही ह्यात सहभागी होऊ शकता.

13 April 2010

वस्तू - आणि - व्यक्ती चित्रणाचे वर्ग कोथरूड मधे




संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे साप्ताहिक वर्ग शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० पासून दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, पुणे येथे सुरू करीत आहोत. ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त संपूर्ण वर्षासाठी असणार आहे ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारी ठीकठीकाणी होणाऱ्या निसर्गचित्रण वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. तसेच ह्या वर्गाला वेळोवेळी मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गाला शालेय विद्यार्थ्यां पासून कोणत्याही वयाच्या स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चितपणे लाभ करून घेता येईल. इच्छूकांनी .
Email ID :- sanskarbharati.pune2010@gmail.com 
श्री.सुरेश पेठे :- ९८५०४८८६४०
 ह्यांचेशी संपर्क साधावा