17 April 2010

वस्तू - आणि - व्यक्ती चित्रण वर्ग सुरू झाला.





                                                                 नटराज पूजन

संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाच्या साप्ताहिक वर्गाला आज  शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१०  रोजी शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, कोथरूड ,पुणे येथे दिमाखात सुरूवात झाली.

प्रथम दुपारी ३ वाजता पुणे शहराचे चित्रकला प्रमुख श्री . कुडल हिरेमठ ह्यांनी प्रास्ताविक केले, त्यात  सर्वांचे स्वागत करीत अखिल भारतीय संस्कार भारती ह्या संस्थेची माहीती दिली.



 प्रस्तुतचा आजचा वर्ग हा पुण्यातील निरनिराळ्या अश्या प्रकारे  कार्यरत असलेल्या वर्गां मधील आठवा असल्याचे नमूद केले.


व्यासपीठावर आजचे उद्‌घाटक श्री. प्रभाकर जोशी , श्री उल्हास जोशी पश्चिम प्रांताचे चित्रकला प्रमुख व श्री भिंगारे, देवस्थानाचे व्यवस्थापक होते. श्री प्रभाकर जोशींची ह्यांची  श्री कुडल हिरेमठ ह्यांनीओळख करून दिली.  त्यांनी जे जे मधून चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर काही शाळां मधून कला शिक्षकाचे काम केले. त्या काळात फोटोग्राफीत मास्टरी  मिळविली.त्यात पेंटींग्स मध्ये कित्येक बक्षीसेही मिळवलीत. सध्या वयाच्या ८६ व्या वर्षीही अजूनही सातत्याने ते रोज एक तरी चित्र काढतातच.





श्री. प्रभाकर जोशींनी  नटराजाच्या मुर्तीचे पूजन केले. आपल्या भाषणात त्यांनी स्केचिंगचे महत्व पटवून देत आजही ते स्वत: रोज स्केचेस काढतात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. कितीही थोडा वेळ असला तरी छोट्यात छोटे स्केच तरी प्रत्येकाने रोज काढायलाच हवे ह्यावर त्यांनी भर दिला आणि ह्या वर्गाचे उद्‌घाटन केल्याचे जाहिर केले.




 त्या नंतर ह्या वर्गाची जबाबदारी घेणारे श्री. सुरेश पेठे ह्यांनी समारोपात देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख ट्रस्टी श्री पेशवे व व्यवस्थापक श्री भिंगारे ह्याचे , ह्या वर्गाला जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून आभार मानले.
शेवटी श्री कुडल हिरेमठ ह्यांनी  प्रसिध्द चित्रकार श्री रामचंद्र खरटमल ह्याची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी,  श्री. प्रभाकर जोशी ह्यांचे पेन्सिलने स्केचींगचे प्रात्यक्षिक  दाखवले.








व्यक्ती चित्रणाचे प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर श्री. रामचंद्र खरटमल ह्यांनी चित्रकाराच्या जीवनातील स्केचिंगचे महत्व सांगीतले. तसेच स्केचिंग कसे कसे करत जावे, काय काय गोष्टी विचारात घेत जाव्यात, कुठल्यांना महत्व द्यावे व स्केचिंग पुर्णत्वास न्यावे ह्याचा उहापोह करीत श्रोत्यांच्या शंकाचेही समाधान केले.



उद्‌घाटनाचा मुख्य कार्यक्रम पार पडल्या वर वर्गाला हजर झालेल्या  सर्वांनी स्केचिंग करून सर्वार्थाने हा सोहोळा पूर्णत्वास नेला.


कार्यक्रमा ची सांगता अमृतकोकम च्या पेयपानाने झाली. कार्यक्रमाला २५ जणांची उपस्थिती होती.


ह्यापुढे दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत हा वर्ग येथेच मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्गरम्य परिसरात भरला जाणार आहे. चित्रकलेची मनापासून आवड व भरपूर काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांना हा वर्ग खुला आहे.  संस्कार भारतीची सभासद फी अत्यल्प म्हणजे रु. २०० /- असून,   ह्या वा अन्य कुठल्याही वर्गावर येऊन साधना करता येते. ह्या वर्गाचे प्रमुख श्री. सुरेश पेठे ( ९८५०४८८६४०)  ह्यांचेशी संपर्क साधून आपणही ह्यात सहभागी होऊ शकता.