07 June 2010

मासिक नृत्य साधनेस सुरूवात झाली !



संस्कार भारती संभाजी भाग, पुणे ह्यांच्या वतीने आज शनिवारी दिनांक ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ७ वाजता  कर्वे रस्त्या वरील श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेची दिमाखात सुरूवात झाली. ठरल्या वेळेप्रमाणे सौ. किशोरी कलघटगी ह्यांनी माईकचा ताबा घेत सूत्र संचालनास सुरूवात केली.

हा त्याचा चलीत अंश पहा




नंतर  संघटन मंत्री श्री. सारंग कुलकर्णी ह्यांनी प्रास्ताविकात संस्कार भारतीची पूर्व पिठीका व ह्या संस्थेच्या कार्याची व निरनिराळ्या उपक्रमांची माहीती दिली..

आजच्या प्रमुख नृत्यांगना सौ. स्वप्ना कुर्डुकर , प्रमुख उपस्थित प्रसिध्द ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर व संभाजी विभागाच्या  भाग प्रमुख सौ. माधुरी जोशी ह्यांनी सुरुवातीला नटराजाचे पूजन केले..


हा त्याचा चलीत अंश पहा

त्यानंतर संस्कार भारतीचे ध्येय गीत झाल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या ओळखी झाल्या.

ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर  ह्यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची पूर्वपिठिका विशद केली.


हा त्याचा चलीत अंश पहा

सौ. गीता कोलंगडे ह्यांनी थोडक्यात आभार मानलेत
 हा त्याचा चलीत अंश पहा

त्या नंतर प्रसिध्द नृत्यांगना सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून आपल्या एकेक रचना सादर करीत व प्रस्तुत नृत्य साधनेचे पहिले पुष्प ओवीत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

हा त्याचा चलीत अंश पहा





हा त्याचा चलीत अंश पहा

हा त्याचा चलीत अंश पहा








हा त्याचा चलीत अंश पहा





हा त्याचा चलीत अंश पहा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी, संस्कार भारती ही अखिल भारतीय संस्था संपूर्ण देशभर आपल्या पंधराशेहून अधिक शाखांमार्फत विविध कलांच्या माध्यमातून करीत असलेल्या कार्यां बद्दल आस्था दाखवली. एव्हढेच नव्हे तर त्यांनी स्वत:हून ह्या संस्थेचा आजपासून कार्यकर्ता होण्याचा मानस जाहिर केला. अश्याच पध्दतीने संस्कार भारतीशी अनेक कलाकार कार्यकर्ते संलग्न झालेले आहेत.

हा आहे जमलेला श्रोतृवर्ग


अश्याच पध्दतीने ह्या पुढे प्रत्येक महीन्याच्या दुसऱ्या शनिवारी येत्या वर्षभर नृत्य साधना  हा नूतन कार्यक्रम विविध कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची मूळ कल्पना सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांची आहे. त्या स्वत: एक  उत्तम नृत्यांगना असून  त्यांनी पुढील वर्षभर ह्या कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी स्विकारली आहे.


ह्यापुर्वी अश्याच पध्दतीने ह्याच देवालयात प्रथित यश गायकांकडून एक वर्ष भर संगीत साधना सादर केली गेली होती, ह्याची आठवण काढीत अनेक उपस्थित श्रोत्यांनी ह्या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात

ह्या पुढेही सादर होणाऱ्या कार्यक्रमांना श्रोतेवर्ग आवर्जून उपस्थित राहून सहकार्य करतीलच.

दैनिक जागरण सिटी प्लस मध्ये आलेला वृत्तांत

03 June 2010

मासिक नृत्य साधना




संस्कार भारती पुणे सहर्ष सादर करीत आहे. एक वर्ष भर प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी  कर्वे रस्त्या वरील श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधना सादर केली जाईल. त्यावेळी प्रसिध्द नृत्यांगना शास्त्रीय नृत्यातून आपली कला देवालयात सादर करतील. ह्यापुर्वी अश्याच पध्दतीने ह्याच देवालयात आपण एक वर्ष भर संगीत साधना सादर केलेली होती.

ह्या नृत्य साधनेचे पहिले पुष्प येत्या शनिवारी दिनांक ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ७ वाजता, सौ. स्वप्ना कुरूडकर ह्या भरतनाट्यम मधील आपल्या  रचनातून सादर करणार आहेत.

त्यावेळी प्रसिध्द ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सर्वांनी ह्या पहिल्या व यानंतर सादर होणाऱ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे.

श्रीयुत रवि देवांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत




काल २ जून रोजी मुंबईला जाण्याचा योग आला. अश्या वेळी तेथील जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या ३ जून पर्यंत चालू असलेल्या श्रीयुत रवि देवांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला जाणार नाही हे कधी तरी शक्य आहे का ? माझ्या समवेत श्री. सुहास वागळे व श्री रघुवीर भरम हे पण आलेले होते. अर्थातच श्री. रवि देवांना आम्हा तिघां पुणेकर संस्कार भारतियांना पाहून मनापासून आनंद होणे हे अगदि स्वाभाविकच होते. तशी ह्या प्रदर्शनातील त्यांची बहुतांश चित्रे प्रत्यक्ष काम चालू असतांना पहायला मिळालेली होती, पण आता ती आर्ट गॅलरीत पहायला मिळणे हा एक अपूर्व भाग्याचा दिवस आहे. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रीणींना ती पहायला न मिळणे शक्य आहे अश्यांच्या सोयी साठी खाली काही क्षणचित्रे सादर करीत आहे.











01 May 2010

दखल दैनिक जागरण, सिटी प्लस, ने घेतलेली

संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे साप्ताहिक वर्ग शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० पासून दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत  श्री. मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, पुणे येथे सुरू झाले आहेत. ह्या वर्गाची दखल दैनिक जागरण, सिटी प्लस, कोथरूड / पौड रोड, ह्यांनी त्यांच्या बुधवार दिनांक २८ आप्रिल,२०१० च्या अंकात घेतली.




फोटोवर क्लिक करा !

ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त संपूर्ण वर्षासाठी असणार आहे ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारी वरील शुल्कात ठिकठिकाणी होणाऱ्या निसर्गचित्रण वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. तसेच ह्या वर्गाला वेळोवेळी मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गाला कोणत्याही वयाच्या स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चितपणे लाभ करून घेता येणार आहे.

30 April 2010

स्नेह मेळावा







काल म्हणजे २९ एप्रिल २०१० रोजी संस्कार भारतीच्या संभाजी भाग व पुणे महानगरा मार्फत स्नेह मेळावा संपन्न झाला.

संस्कार भारती या अखिल भारतीय स्तरावर कलांच्या माध्यमातून संस्कार क्षम समाज घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थेची पुण्यात स्थापना होण्याच्या घटनेला चोवीस वर्षे पूर्ण होऊन रौप्य वर्षात पदार्पण होत आहे.

पुण्यात त्या क्षणाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याचे मनसुबे सुरू आहेतच. संस्कार भारतीच्या एकूण कार्यप्रणालीत संघटनेचे महत्व आपण सर्वच जाणून आहोत व त्यालाच केंद्र स्थानी ठेवून आज सारे कार्यकर्ते उत्सव मंगल कार्यालयात जमलो होतो. आजचा हा मेळावा आहे , नित्याची बैठक नाही हे आवर्जून सांगीतले गेले.

त्या साठी ध्येय गीत व एका समूह गीता नंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतला गेला व सर्व कार्यकर्ते आपसूकच अधिक मोकळे झाले.

मग झाली ती मुक्त चर्चा, विषय अर्थातच संघटनात्मक वृध्दी साठी काय केले पाहिजे? त्या साठी एक प्रश्नावली पण उपलब्ध केली, जी प्रत्येकाने भरून दिली. ती मते नंतर एक गठ्ठ्याने चहापानाचे वेळी श्री. शामराव जोशीं कडे सुपूर्त केली पुढील अभ्यासा साठी !

त्यानंतर श्री. शामराव जोशी, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ह्याचे पुढे तासभर अस्खलित व नेटके मार्गदर्शन पर भाषण झाले.

खिचडी व कढीचा पोटास आधार देत कार्यक्रमाची सांगता झाली.



१) श्री. शामराव जोशी, ह्यांचे मार्गदर्शन चालू असतांना.





२) कार्यकर्ते मन लावून भाषण ऐकण्यात तल्लीन.
 
 

25 April 2010

शिकवण्याचा पहिला दिवस !





मागिल शनिवारी १७ एप्रिल ला संस्कार भारतीच्या वतीने येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परिसरात वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्गाचे उद्‌घाटन झाले.

http://roupya.blogspot.com/2010/04/blog-post_17.html

कालचा शनिवार हा त्या नंतरचा पहिला शनिवार. खरे तर संस्कार भारतीच्या वर्गांतून कोणीही एकजण असे काहीही शिकवत नाहीत. चित्रकला ही एक कला आहे व एकत्र येण्यातून, एकमेकांचे बघून आणि स्वत: साधना करीत ही कला साध्य होते असा आमचा विश्वास आहे. तॊ ही एक संस्कार आहे. त्याला वयाची वा कसलीच आडकाठी वा मर्यादा नाही. माणसाच्या अंगीची अनुकरण प्रियताच येथे कामी येते व येथे येणारा प्रत्येक जण आपोआप शिकत जातॊ  अशी आमची धारणा आहे. तरी सुध्दा प्रस्तुत वर्गात पहिल्यानेच प्रवेश घेणाऱ्या ची वये आधीचे अनुभव ह्या सर्वांचा विचार करता येथे आधी थोडेशी पार्श्वभूमी तयार करावी लागणार ह्याची मला जाणीव झाली.
आज प्रथमच येणाऱ्यात १ मुलगा २ रीत गेलेल्या, दोघी ५ वीत गेलेल्या तर एक ७ वीत, रेग्युलर चित्रकला शिकणारी एकच ! बाकी काही मध्यमवयीन स्त्री पुरूष तर एक आजोबा ८० व्यात पदार्पण केलेले. त्यातील बहुतेकांची कल्पना शिसपेन्सिलीचा उपयोग लिहिण्याकरताच होतो व तीही कधी काळी हाती धरलेली ! चित्र काढण्या साठीही उपयोग होतॊ ह्याची जाणीव नव्यानेच होत असावी ! मात्र एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे चित्रकला यावी अशी मात्र सर्वांची दुर्दम्य इच्छा आणि तोच महत्वाचा प्लस पॉईंट !

माझी मात्र परीक्षा आहे खरीच. पहीलाच दिवस खूप धांदलीत गेला,ओळखी माहीतीची देवाण घेवाण इ.इ. पण सुरूवात तर छान झालीय ! अगदी पहीला धडा होता चित्रकले साठी पेन्सिल कशी हातात धरावी ! तिथे असलेली साधी पाण्याची बाटली माझ्या पहाण्यात आली व तीच समोर ठेवून त्याचे चित्र काढायला सांगीतले. मग लक्षात आले की चित्र काढण्यासाठी वस्तु कडे बघायचे कसे , काय ? तिला कागदावर चितारायचे म्हणजे काय करायला हवंय ? मग प्रश्न पडला ह्याचे मोजमाप घ्यायचे म्हणजे कसे? कागदाच्या आकारात ते कसे बसवायचे? प्रश्नातून प्रश्न येत होते.
पण तरीही पहीलाच दिवस खूप चांगला गेला. तसं म्हटलं तर मी तरी चित्रकला हा विषय कुठे शास्त्रशुध्द शिकलेलो आहे ? पाचवी ते आठवी व त्यातच चित्रकलेच्या दोन परिक्षा एव्हढेच माझे तुट्पुंजे शिक्षण. तेव्हा आम्हाला नाशिकला पेठे हायस्कूल ला डोंगरेसर नावाचे चित्रकला शिक्षक होते. खरे तर ते प्रसिध्द चित्रकार व्हायचे त्यावेळेच्या प्रसिध्द चित्रकारात त्यांची चांगली उठबस होती. मला आठवत्येय केवळ मैत्रीखातर अलमेलकरांसारख्या प्रसिध्द चित्रकारांचे प्रात्यक्षिक आम्हाला शाळेत दाखविण्याची व्यवस्था डोंगरे सरांनी केली होती.  त्यांनी स्वत:ला चित्रकला शिकविण्याला वाहून घेतलेले होते. अगदी हाडाचे शिक्षक. त्यांनी त्यावेळी काय काय शिकवले होते त्याचे अर्थ मला गेल्या सहा वर्षातील संस्कार भारतीच्या नित्य साधनेतून उलगडत गेले. तीच आमची गांठीला बांधलेली शिदोरी, बहुदा आता उपयोगी पडेलसे वाटतंय !

22 April 2010

ब्लॉगचे पुनरुज्जीवन




मागे मी एक संस्कार भारतीच्या रौप्य महोत्सवाचे वेळी ब्लॉग सुरू केला होता. माझ्या त्याच जुन्या ब्लॉग चे नव्याने रूप पालटवले आहे. ह्या ब्लॉगचे नाव ठेवले आहे.

" संस्कार भारती, पुणे "

आज जो मी काही आपण समोर आहे त्यात संस्कार भारतीचा फार म्हाणजे फारच मोठा वाटा आहे. एक काळ असा आला होता की आता मी पुढे काय करायचे? नोकरीतून कधीच सेवानिवृत्ती घेतली होती ( १९८७ मधेच ). त्यानंतर मी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बिल्डर झालॊ. मिलिटरी इंजीनीयरींगची अनेक कामे पार पाडलीत. एकाच वर्षात दोन्ही कन्यकांना त्यांचे त्यांचे घरी रवाना केले. वयाची साठी होऊन गेली होती व आता कुठे तरी थांबावे असे प्रकर्षाने वाटू लागले होते.

अश्याच वेळी माणसाला काही तरी विरंगुळाच्या छंदांची अवश्यकता असते. मला चित्रकलेची लहान पणा पासून आवड. पण तेव्हा आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याचा काळ नव्हता. त्यातून चित्रकला हा विषय म्हणजे आयुष्य़भर शामा ( शाळा मास्तर ) ही पिढ्यांपिढ्याची कल्पना ! कुठल्या आईबापाला ती आवडेल? म्हणून आमची रवानगी दुसऱ्या विषयाकडे झाली !

माझे नशीब अत्यंत थोर असेच मी म्हणेन, कारण नेमक्या अश्या वेळी एका व्यक्तीने माझे बोट धरून थेट संस्कार भारतीच्या दारात आणून सोडले. त्यालाही आता सात वर्षे होतील. पण त्या दिवसा पासून जे पेन्सिल, रंग, कागद आणि ब्रश हाती आले ते मात्र हातात घट्ट राहून गेले. एका भरकटू पहाणाऱ्य़ा मनाला पुढला मार्ग स्वच्छ दिसला होता. वेळ कसा घालवायचा त्या ऐवजी वेळ कसा पुरवायचा असेच प्रश्न पडू लागले आणि फारा वर्षांची इच्छा फलद्रुप झाली. इतक्या उशीराने का होईना माझी चित्र साधना जोमाने सुरू झाली. आपणाला जसा हा हा मार्ग सांपडला तसा इतर गरजूंनाही ही वाट दाखवावी असे वाटू लागले.

आणि म्हणूनच आता एका नवीन "वस्तु व व्यक्ती चित्रणाच्या" वर्गाची मी जबाबदारी घेतलीय, ज्याचे उद्‌घाटन गेल्या १७ एप्रील २०१० रोजी पुण्यातील कोथरूड मधील मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परीसरात पार पडले.

त्याचा वृत्तांत  आधीच्या चित्रमय पोस्ट मधे दिला आहेच.